पुणे, दि. 8 -राज्य शासनाच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नसल्याने वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी रुग्णांना मुंबईतील जे जे रुग्णालय येथे जावे लागत आहे. याचा फटका शासकीय कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. याबाबत आम आदमी पक्षानेही प्रशासनाला जाब विचारला आहे.
सरकारी कर्मचारी एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्याला ससूनच्या वैद्यकीय स्थायी मंडळाचा दाखला आवश्यक आहे. त्याखेरीज त्याला रजा व वेतन अदा केले जात नाही. त्यातच मेंदू किंवा मज्जासंस्थेच्या आजाराचा दाखला ससून रुग्णालयात मिळत नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत आहेत. एकीकडे आजाराचे संकट, दुसरीकडे वेतन रोखल्याने अडचण, तर तिसरीकडे सरकारी रुग्णालये डॉक्टर, कर्मचारी यांची हे अतिरिक्त काम असल्याने त्याकडे बघण्याचा बेफिकीर दृष्टिकोन. ह्यामुळे महिनोंमहिने सदर प्रकरणी रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात. त्यातच दिव्यांग कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे बिबवेवाडी विभाग समन्वयक घनश्याम मारणे व कुमार धोंगडे यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे यांची यांनी भेट घेतली. यावर त्यांनी ही परिस्थिती तातडीने सुधारण्याचे आश्वासन देत लवकरच न्युरोलॉजिस्टची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.