“राज्यात लॉक डाऊन नाही, मात्र…” – आरोग्यमंत्री टोपेंची महत्वपूर्ण माहिती

जालना – राज्यात करोनाची दुसरी, तिसरी लाट येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ही केवळ लाटच नसेल तर ती करोनाची सुनामीही असू शकते याची भीती आहे. त्यामुळे सर्वांनीच पुन्हा नीट काळजी घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हंटले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘अनेक राज्यांमध्ये करोनामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले आहेत. आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्यालाही असे काही कडक उपाय योजावे लागतील.’ असेही सांगितले होते.

अशातच आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून अशी  मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं म्हंटलंय.

“बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. लॉक डाऊन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे,” असंही टोपे यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.