कोरोनाचा ‘धसका’! ‘या’ राज्यात 2020 संपेपर्यंत शाळा बंद

बंगळुरू – कर्नाटकातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये डिसेंबरअखेर सुरू करण्यात येणार नाहीत, असे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी केली.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात, शिक्षण विभागाला शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य संबंधितांनी शाळा पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हा निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला होता. मात्र, करोनाबाबत नेमलेल्या समितीने शाळा सुरू करण्यास विरोध करणारा अहवाल रविवारी सादर केला. त्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्नाटकात शाळा सुरू करू नयेत, असा सल्ला त्यात देण्यात आला होता.

माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री सुरेश कुमार म्हणाले, या तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये डिसेंबरअखेर सुरू करणार नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल. त्यात परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. मात्र, दूरदर्शन, स्थानिक चॅनेल चंदनच्या माध्यमातून पाचवी ते 10 वीच्या मुलांचे शिक्षण सुरूच राहील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.