मुंबई : पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांचे हे वक्तव्य खरे असेल तर त्याचे निश्चितच आम्ही स्वागत करू. असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी घेतलेली भुमिका योग्य आहे, त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थन आम्हाला आहे ते खरे ठरेल. परंतु त्याचवेळेला द्विधा वातावरण निर्माण करण्याचे काम पवारांची कुठलीही भुमिका करत असते.
एका बाजूला आमचे फोटो लावायचे नाहीत अशा प्रकारच्या सूचना जातात याचा अर्थ काय आहे. जर पक्ष एक आहे, अजितदादा आपले नेते आहेत आणि पवार साहेबांना ते दैवत मानत असतील तर फोटोच्या आक्षेपाचे काही कारण नाही.असेही त्यांनी यावेळी म्हटले.
परंतु आमच्यासाठी ही स्वागताहार्य भुमिका असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना नेमके आपल्या भूमिकेतून काय सांगणार आहात. पक्ष एकच आहे तुम्ही वादविवाद करू नका,संघर्ष करू नका, सगळ्यांनी सगळ्यांचे फोटो लावा. कार्यकर्त्यांची अवस्था तुम्ही समजून घेत नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.
दरम्यान, जनतेला काय वाटते याचा विचार करत नाही. कारण शेवटी जनतेच्या जीवावर आपण राजकारण करतो. त्यामुळे स्वतःच्या राजकारणासाठी एका बाजूला परिवार एक आहे म्हणायचं, दुसऱ्या बाजूला भुमिका विरोधात घेऊन सभा घ्यायच्या. अशा प्रकारचे राजकारण शरद पवार यांनी सातत्याने केले आहे.
परंतु आमच्यासाठी स्वागताचे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन अजित पवार यांनी दिले आहे. त्यांच्याएवढा देशाला पुढे नेणारा नेता कुणी नाही.अजितदादा राष्ट्रवादी पक्ष म्हणून सोबत आहेत असे सांगताहेत आणि शरद पवार समर्थन करत असतील तर त्याचे स्वागतच होईल. परंतु पवारांनी घेतलेल्या भूमिकेचा अर्थ कळायला काही काळ जायला लागतो. त्यामुळे खरे काय, खोटे काय हे येणारा काळ स्पष्ट करील.