नागपूर – नागपुरात बुधवारी तब्बल ८६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यात एकाच दिवशी करोना रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण शहरच करोनाच्या विळख्यात जाण्याची भीती व्यक्त केली आहे.
तुकाराम मुंढे म्हणाले कि, नागपूर शहरात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, काल दिवसभरात ८६ करोना रुग्ण वाढले. नागपूरच्या रहिवाशांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्यामुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात डबलिंग रेट काही दिवसांवर येईल आणि संपूर्ण नागपूर शहर करोनाच्या विळख्यात जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
गरज नसताना घराबाहेर पडणे टाळा, जनतेची साथ मिळाली नाही, तर शहर हाताच्या बाहेर जाईल. तसेच नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही मुंढे यांनी दिला आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ८६३ वर पोहोचली आहे.