बारामती -बारामतीच्या ग्रामीण भागात आठ दिवसात एकही करोना संक्रमित व्यक्ती आढळली नाही. दरम्यान, बारामती शहर करोनामुक्त झाल्यानंतर तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाने शिरकाव केला. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढल्याने बारामतीकर धास्तावले होते; मात्र गेले आठ दिवसापासून एकही करोना संक्रमीत रुग्ण आढळून आला नाही त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे.
बारामती शहर व तालुक्यात 22 करोना संक्रमित रुग्णांची आत्तापर्यंत नोंद झाली. तीन करोना संक्रमित रुग्णांचा त्यामध्ये मृत्यू झाला. 16 करोना संक्रमित रुग्ण कोरनामुक्त झाले तर तिघांवर बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालय उपचार सुरू आहेत. शहरातील श्रमिकनगर येथे दि. 29 मार्च रोजी पहिला करोना संक्रमित रुग आढळून आला.
त्यानंतर करोना संसर्ग वाढत गेला सुरुवातीला शहरात करोना प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शहरात भिलवाडा तसेच बारामती पॅटर्नचा प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. बारामती शहर व तालुका सीलबंद झाले. बारामतीकर देखील घराबाहेर पडले नाहीत. नागरिकांना जीवनावश्यक सुविधा घरपोच पुरविण्यात आल्या. त्यामुळे बारामती शहर करोनामुक्त झाले.
शहर करोनामुक्त झाल्यानंतर तब्बल 41 दिवसानंतर शहरातील तांदुळवाडी येथे करोना संक्रमित रुग्ण आढळून आला. बारामती शहरानंतर ग्रामीण भागात करोना शिरकाव झाला. तालुक्यातील माळेगाव येथे ग्रामीण भागातील पहिली करोना संक्रमित व्यक्ती आढळली. त्यातच शहरातील करोना संक्रमित भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामीण भागातील माळेगाव कोऱ्हाळे बुद्रुक येथील रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, शहर व तालुक्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 22 इतकी झाली. त्यामध्ये दि. 2 जून रोजी कोराळे बुद्रुक येथे शेवटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
गर्दी वाढली
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती ती पूर्ववत सुरू झाली आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लॉकडाऊन शिथिल केले असले तरीदेखील आवश्यक करण्याव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे.
करोनाग्रस्तांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 16 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. कोऱ्हाळे बुद्रुक येथील तीन रुग्ण बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. -डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती