उच्चभ्रू सोसायटी गुन्ह्यासाठी टार्गेट 37 लाखांचा ऐवज जप्त; 127 गुन्ह्यांची उकल
पुणे – हैद्राबाद येथून पुण्यासह राज्यातील विविध नामांकित शहरांत तो विमानाने यायचा. चोरी करून फरार होणाऱ्या हायप्रोफाईल चोरट्यांसह चोरीचा ऐवज स्वीकारणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. संबंधित “हायप्रोफाईल’ चोरट्याने शहरातील 82 ठिकाणच्या चोरीसह तब्बल 127 गुन्हे केले आहेत.त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल 37 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
मौजमजा आणि ऐषोरामासाठी स्वीकारला चोरीचा मार्ग
सलीम अली हुसेन खान ऊर्फ मुन्ना कुरेशी ऊर्फ मोहंमद हमीद हबीब कुरेशी (वय 46, रा.गोवंडी, मुंबई, मुळ रा. हैद्राबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा पुण्यातील साथीदार ईश्वर ऊर्फ चिंट्या शिंदवळ (रा. येरवडा) याच्यासह चोरीचा ऐवज स्वीकारणाऱ्या शरीफ मोहंमद ख्वाजा मैनुद्दीन शेख, बिलाल ऊर्फ अशोक गोविंद प्रधान, अब्दुल सत्तार मोहंमद नजीर अहमद सत्तार, मोघल अन्वर अली करीम बेग, प्रभु कल्लापा नंजवडे (सर्व रा. हैद्राबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम सराईत गुन्हेगार असून जून 2018 मध्ये कारागृहातून सुटला आहे. तो मुळचा हैद्राबाद येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून पुणे शहरासह नाशिक, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात चोऱ्या करीत होता. मागील दीड वर्षांपासून त्याने विविध ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी आणि ऐषोरामासाठी त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला होता. बहुतांश शहरांतील उच्चभ्रु सोसायटीत चोरी करण्यासाठी त्याठिकाणी स्थानिक चोरट्यांची मदत घेत होता. चोरी करण्यासाठी सलीम घरामध्ये जाण्यापूर्वी खबरदारी म्हणून साथीदाराच्या हातात पेपरस्प्रे बाटली देत होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत चोरी केल्यानंतर तो पळ काढत होता.
हैद्राबादमध्ये राहताना त्याने भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला होता. चोरी करण्यासाठी तो विमानाने पुण्यात येत होता. त्यानंतर अलिशान कारमध्ये बसून टेहाळणी केलेल्या सोसायट्यांमध्ये रात्रीच्यावेळी ऐवजाची चोरी करीत होता. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, संतोष मोहिते, प्रदीप सुर्वे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, राजाभाऊ भोरडे, बंडू शिंदे, संजय देशमुख, अमजद पठाण, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर,
अश्रुबा मोराळे, सचिन घोलप, दया शेगर, अंकुश जोगदंडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.
शहरात 82 चोरीचे गुन्हे
पुण्यातील साथीदार ईश्वर शिंदवळच्या मदतीने त्याने 82 उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये चोरी केली होती. त्यानंतर चोरीचा ऐवज हैद्राबाद येथे नेऊन तेथील साथीदारांमार्फत विक्री करीत होता. त्याने शहरात 82 चोरीचे गुन्हे केले आहेत. उर्वरित 47 गुन्हे मुंबई, दिल्ली आणि हैद्राबाद येथे केल्याचे उघडकीस आले आहे.