निर्मळ प्रेमाची उत्कट अनुभूती प्रेरकच..!

“हे सुरांनो, चंद्र व्हा… चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा…’ हे गाणं ऐकलं की, मन वेगळ्याच दुनियेत जातं. शब्दांमधून व्यक्‍त होणारी प्रेमाची उत्कटता काय असते, त्याची प्रचिती हे गाणं ऐकताना येते. “उत्कट’ आणि “उत्तान’ या शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. खरं तरं प्रेम ही एक भावना. ते ठरवून करता येत नाही. आतून यावं लागतं. मनापासून जपावं लागतं.

ते फक्त एका दिवसासाठी नसतं, क्षणोक्षणी वाढत जाणारं असतं. “व्हॅलेन्टाइन डे’पुरतं मर्यादित तर नसतंच नसतं. प्रेम माणसाच्या जगण्यातील महत्त्वाचा भाग असतं. ते प्रेरणा देतं. ते जगणं शिकवतं. भावविश्‍व समृद्ध करणारं असतं. मनाच्या हिंदोळ्यावर झुलणारी प्रेमभावना, जगण्याचा आनंद खुलवणारी असते. प्रेम मनातील आस, हृदयाचं स्पंदन असतं.

प्रेमाची जाणीव भावनिक पातळीवर फुलणारी असते. मनाचा खरेपणाच या जाणीवेला मूर्त रूप देऊ शकतो. प्रेम सांगायचं नसतं, प्रेम बोलायचं नसतं. ते मनात असावं लागतं. त्याचं प्रदर्शन नको असतं. प्रेम मनात उमलतं. डोळ्यांमधून व्यक्त होतं. एकमेकांना जीव लावतं. त्यामुळेच खऱ्या प्रेमाची अनुभूती घ्यायची असते.

प्रत्येक देशात व्हॅलेंटाइन डे वेगळ्या पद्धतीन साजरा करतात. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या 70 वर्षांच्या आजीला गुलाब देऊन व्हॅलेंटाइन डे साजरा करु शकतो. एखाद्या आई-वडिलांना आपल्या मुलीपेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाइन असू शकेल? मैत्रीणसुद्धा आपला व्हॅलेंटाईन होऊ शकते. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे.

पूजा अशोक भोसले, कोरेगाव 

फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी सगळे यातच गुंतात. मला इतकाच जाणवत की प्रेम निरागस असतं, ते तसाच ठेवावं आणि आत्ताच्या काही घटना पाहता प्रेमाची खरी व्याख्या तर तरुणपिढी विसरलीच आहे, प्रेम एकतर्फी पण करू शकता अगदी तिला किंवा त्याला न सांगता आणि सांगितलं तरी येणारा होकार किंवा नकार दोन्ही पचवता यायला हवे. म्हणजे काय तर प्रेमात राधाकृष्ण नक्की व्हा पण कबीर सिंग नाही, बाकी आयुष्य सुंदर आहे, तर रोज व्हॅलेंटाईन डे साजरा करा; फेब्रुवारी महिन्याची वाट न पाहता.

भाग्यश्री पवार, सातारा.

व्हलेंटाइन डे विषयी असणाऱ्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो, पण ज्यावेळी प्रेम या शब्दाबद्दल मी विचार करतो, त्यावेळी मला वाटत खरच प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या दिवसाची गरज आहे का? बर यापुढेही मी म्हणतो मग ब्रेकअप डे, स्लॅप डे असेही डेज साजरे करायला हवेत… आणि मुळात ही भारतीय संस्कृती नाही… प्रेमच आहे ना तर मग ते व्यक्त करायला निमित्त कशाला? असे दिवस ठरवून प्रेम व्यक्त करणं म्हणजे खरच प्रेम की व्यवहार..?

प्रतिक फडतरे, जकातवाडी, सातारा.

व्हॅलेंटाइन डे.. प्रेमाचा दिवस… तसा तर प्रेमाचा असा ठराविक दिवस नसतो.. पण माणसाला उत्सव आवडतो.. त्यामुळे प्रेमाचा उत्सव करायला काहीच हरकत नाही.. आणि त्यात आपण भारतीय प्रेम व्यक्त करायच्या बाबतीत बुजरेच असतो… त्यामुळे यानिमित्ताने का होईना प्रेमाचा उत्सव साजरा करतो आपण! आपलं प्रेम व्यक्त करू शकतो… पण, “तू हा कर, या ना कर, तू हैं मेरी किरण’ अशा प्रकारच्या भावनेला एकतर्फी प्रेमाचे नाव देऊन आपणच प्रेमाला बदनाम केले आहे. त्यामुळे आजकाल हिंसक झालेल्या वातावरणात खऱ्या प्रेमाची, मैत्रीची साद घालणारे लोक हेच माणूस म्हणून अधिक चांगला समाज घडवू शकतात… कुसुमाग्रज म्हणतात तसं, प्रेम हीच आहे माणसाच्या अभ्युदयाची आशा एकमेव!’

सोनम पोवार

Leave A Reply

Your email address will not be published.