वाई – शहरातील पेटकर कॉलनीतील एका घरात घुसून तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत सोन्या- चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्याने चाकून वार केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौरी सूर्यकांत वंजारी यांनी वाई पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की, गौरी वंजारी रविवार पेठेतील पेटकर कॉलनीत सर्वानंदनगरमध्ये पती व दोन मुलांसमवेत राहत आहेत. त्यांचे पती हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. रोज रात्री दहा वाजता ते कामावर जातात. दुमजली असलेल्या या घराच्या वरच्या मजल्यावर थोरले दीर कुटुंबीयांसह राहण्यास आहेत. त्यांना जाण्या- येण्यासाठी घराच्या बाहेरुन जिना असून ते रोज रात्री दहा वाजण्याच्या पुढे घराला बाहेरुन कुलुप लावतात. सोमवारी रात्री एकत्रित जेवण केल्यानंतर दहा वाजता पती कामावर निघून गेले. त्यानंतर लहान मुलगा श्रीराज यांच्यासमवेत गौरी वंजारी झोपी गेल्या. यावेळी दाराला आतून कडी लावण्यास त्या विसरल्या.
रात्री दोनच्या सुमारास त्यांना अचानक जाग आली. त्यावेळी डोक्याजवळ साडेपाच फूट उंचीचा, काळा सावळा व सडपातळ तरूण उभा असलेला दिसला. त्याने गळ्यातील सोन्याचे गंठन व कानातील दागिने काढण्यास सांगितले. त्याला अचानक पाहून त्या ओरडल्या. त्यावेळी त्याने हातातील चाकूने डाव्या हाताच्या कोपराजवळ वार केला. त्यामुळे जखम होऊन त्यातून रक्त येवू लागले. ओरडलीस तर जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. भीतीपोटी गळ्यातील व कानातील दागिने त्यांनी काढून दिले. तरूणाच्या सोबतची दुसरी व्यक्ती पायाजवळ उभी होती. तर तिसरा दारात उभा होता.
त्यानंतर तरूणाने कपाटाची चावी मागितली. परंतु, चावी माझ्याकडे नाही, असे म्हणताच त्याने हातातील चाकूसारख्या हत्याराने कपाट उघडले व त्यातील लॉकरमधील दीड तोळ्याचे गंठण, सात ग्रॅंमची सोन्याची चेन, नऊ ग्रॅंमचा नेकलेस, तीन ग्रॅंमची अंगठी, एक तोळयाची कर्णफुले, अडीच गॅंमच्या लहान बाळी व बदाम, चांदीचे पैजण, लहान मुलाचा चांदीचा कंबरपट्टा, 12 हजार रुपये रोख रक्कम व मोबाइल असा सुमारे अडीच ते तीन लाखाचा ऐवज चोरून नेला.
चोरटे अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील, सडपातळ आणि अंगात राखाडी व काळ्या रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेले होते. त्यांनी तोंडास रुमाल बांधला होता. ही चोरी करण्यापूर्वी चोरटयांनी लगतचे एक कुलुपबंद मोकळे घर फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे समजते. या जबरी चोरीच्या तपासासाठी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
श्वान पथक लगतच्या शेतात जावून घुटमळले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराचा शोध घेतला, त्यावेळी लगतच्या ओढयात चोरट्यांनी टाकलेली लेडीज पर्स मिळाली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोतेकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.