शहराच्या हद्दीबाहेरील कर्मचाऱ्यांनाही शहरात मिळणार प्रवेश
उद्याने, सर्वच्या सर्व दुकाने खुली होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या पंधरा दिवसांत शहरातील निर्बंध टप्प्या टप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दुकाने अटी व शर्तींसह सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये आणखी शिथिलता देत शहरातील सर्वच्या सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जनजीवन आणखी पूर्वपदावर येण्यास मदत होणार असून शहरातील उद्यानेही ठराविक वेळेत सुरु करण्यात येणार आहेत. तसेच कंपन्यामध्ये काम करणाऱ्या शहराबाहेरील कर्मचाऱ्यांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरामध्ये अनलॉकचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये थोडे-थोडे लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जात आहेत. शहरातही जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथील केले जात आहेत. शहरातील उद्याने तब्बल दोन महिन्यांनंतर उघडली जाणार आहेत. शहरातील सर्व बागा, उद्याने नागरिकांसाठी सकाळी पाच ते आठ व दुपारी चार ते सायंकाळी सात पर्यंत खुली करण्यात येणार आहेत. याठिकाणी फक्त स्वत: करावयचे व्यायाम प्रकार, एकाट्याने खेळायचे खेळ, जॉगिंग, धावणे व चालणे यासाठी मुभा देण्यात आली आहे.
शहरातील सर्व बाजारपेठेतील सर्व दुकाने यापुढे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील. शहरातील उद्योगधंदे सुरु झाले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांअभावी उद्योजकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन त्यासाठी बाहेरील कर्मचाऱ्यांनाही शहरात येण्यास तसेच काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंद्याना चालना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध निर्बंध शिथील करत जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबतचे आदेश पालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.