नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामकाजाच्या पध्दतीला विरोध दर्शविण्यासाठी देशातील तरूण नेते पुढे सरसावले आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्षांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली असली तरी याच आघाडींच्या युथ विंगने सरकारविरूध्द एकजूट होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या युवा आघाडीच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक दिल्लीच्या कॉस्टीट्युशन क्लबमध्ये पार पडली.
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते धीरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या युथ विंगच्या नेत्यांची एक बैठक आज दिल्लीत बोलाविण्यात आली होती.
यात इंडियन युथ कॉग्रेस, आल इंडिया युथ फेडरेशन, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन,राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष युथ विंग, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, आल इंडिया मुस्लिम लीग आणि आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीच्या नेत्यांनी भाग घेतला होता.
या आघाडीला ‘इंडी युथ फ्रंट’ म्हटले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाविरूध्द इंडीया आघाडीतील घटक पक्षांच्या या युथ विंगने २९ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. याशिवाय तीन मार्च रोजी हरयाणात रॅली करणार आहेत.