नवी दिल्ली – इस्रायलच्या सैन्याने गाझाच्या दक्षिणेकडील टोकाच्या रफाह शहरातील मुख्य रुग्णालयावर हल्ला केल्याचे गाझामधील आरोग्य मंत्रालयाने आज म्हटले आहे. अनेक आठवड्यांपासून युद्ध सुरू असल्यामुळे खान युनूस शहरातील नासेर हॉस्पिटलशी असलेला संपर्क तुटला होता. या रुग्णालयात शेकडो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला होता. मात्र आता या रुग्णालयातील या पॅलेस्टिनींना जाऊ देण्यासाठी एक मार्ग रिकामा केल्याचे इस्रायलने बुधवारी जाहीर केले. त्यानंतर या पॅलेस्टिनींनी त्वरित तेथून जायला सुरुवात केली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले.
आज इस्रायली सैन्याने रुग्णालयावर हल्ला केला. त्यात एक रुग्ण मारला गेला. तर ६ रुग्ण जखमी झाले आहेत. या मोठ्या रुग्णालयातील हजारो रुग्णांना आणि पॅलेस्टिनींना तेथून निघून जाण्याची सूचना इस्रायलने केली आहे.
दरम्यानच्या काळात बुधवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्त्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान १३ लोक ठार झाले आणि १० जण जखमी झाले. यात मुख्यतः महिला आणि मुले आहेत. याशिवाय गाझाच्या हमास दहशतवाद्यांचा सहयोगी असलेल्या हिजबुल्लाहचे तीन सैनिक देखील मारले गेले.
लेबेनानने केलेल्या रॉकेट माऱ्यामध्ये इस्रायलचा सैनिक मारला गेल्यानंतर इस्रायलने हा हल्ला केला. इस्रायलचा हा हल्ला आणखीन व्यापक प्रमाणात होण्याचीही शक्यता आहे. हा रुग्णालयाला होणारा औषधांचा आणि वीजेचा पुरवठा आगोदरच खंडीत झाला आहे. रात्रीच्या अंधारातच रुग्णांनी जमेल तसे या रुग्णालयातून पळ काढला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला आणि युद्ध सुरू ठेवण्याचे संकेत दिले. त्यानंतर गाझामधील युद्धविरामासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी रखडल्या आहेत.