देहूगाव – देहूगाव येथील 28 वर्षीय पूजा तानाजी बुधावले हिने 85 दिवसांमध्ये आठ हजार किलोमीटर सायकल चालवून बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रा पूर्ण केली आहे. सायकल यात्रे दरम्यान तिने “योग मेरा कर्म है, एकता मेरा धर्म है’ हा संदेश देत जनजागृती केली. प्रत्येक जाती धर्माची व्यक्ती योग करू शकतो. योगचे फायदे होत असल्याचे तिने जनजागृती करताना आपल्या संदेशात सांगितले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पवित्र भूमि देहुतील रणरागिनी, सायकल क्वीन्स पूजा बुधावले ही खेळाडू आहे. धावणे, सायकलिंग, स्विमिंग हे तिचे छंद आहेत. गिर्यारोहण आणि योगा हे तिचे प्रोफेशन आहे. ती योग शिक्षिका आहे. योग प्रचारासाठी पूजाने बारा ज्योतिर्लिंग दर्शन घेत भारतातील आठ राज्यातून आठ हजार किलोमीटर सायकल यात्रा 85 दिवसात पूर्ण केली. दररोज ती 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास सायकलने करीत होती.
योग प्रचार बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रेची सुरुवात 8 ऑक्टोबर 2022 रोजी केदारनाथ येथून केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ, मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि उज्जैन, गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग केले. त्यानंतर पूजा हिने महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, त्रंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर केले. त्यानंतर तेलंगणा राज्य पार करून आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम-मल्लिकार्जुन स्वामी आणि तमिळनाडू येथील रामेश्वरम ज्योतिर्लिंग येथे 31 डिसेंबर रोजी ही सायकल यात्रा पूर्ण केली. समाजामध्ये योगा जागृती आणि एकतेचा संदेश हा यात्रेचा उद्देश होता. त्यासाठी “योग मेरा कर्म है, एकाता मेरा धर्म है’ या संकल्पनेतून जनजागृती केली.
अनेक ठिकाणी दिले योगाचे धडे
पूजा बुधावले हिने आपल्या सायकल प्रवासात अनेक ठिकाणच्या शाळा, विद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांना योगाची माहिती देत प्रशिक्षणही दिले. तसेच आपल्या सायकल यात्रेमागचा उद्देशही तिने विद्यार्थ्यांना सांगितला. आगामी काळातही आपण अशाच प्रकारची योगाबाबज जनजागृती करणार असल्याचे पूजा हिने दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले.