पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते, तिथे त्यांची अचानक तब्येत बिघडली. घाईघाईत त्यांना फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते यादरम्यान चालतांना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले.
जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांची प्रकृती खालावताच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आज सकाळी ७ वाजता लुधियानाच्या लोदोवाल येथून राहुल गांधींचा प्रवास सुरू झाला. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी १० वाजता पोहोचणार होती, तिथे जेवणासाठी ब्रेक होणार होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता फगवाडा बस स्थानकाजवळ थांबेल. आज यात्रेचा रात्रीचा विसावा कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता.