आमदार अशोक पवार ः शिक्रापूर येथे कुस्ती स्पर्धा
रांजणगाव गणपती – कुस्ती क्षेत्रामध्ये शिरूर तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व अजिंक्यतारा क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान शिक्रापूर मोलाचे काम करत आहे. कुस्तीगीरांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक पवार यांनी केले.
पुणे जिल्हा व शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने अजिंक्यतारा क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान शिक्रापूर, तसेच ग्रामस्थ भांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, राष्ट्रीय पंच दिनेश गुंड, जि. प. सदस्या रेखा बांदल, सुनीता गावडे, सविता बगाटे, राजेंद्र जगदाळे तसेच तालुक्यातील पदाधिकारी, कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आबासाहेब शेंडगे मल्लसम्राट
शिरूर तालुका मल्लसम्राट विजेता आबासाहेब शेंडगे यास मानाची चांदीची गदा, दुचाकी व रोख 15 हजार 111 रुपये, तर उपविजेत्या पै. ओमकार येलभर यांस दुचाकी व रोख 11 हजार 111 रुपये बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याचबरोबर शिरूर तालुका विजेत्या शैला धुमाळ (पिंपळे धुमाळ) या महिला कुस्तीपटूस चांदीची गदा, स्कूटी व रोख 11 हजार 111 रुपये, तर उपविजेत्या कोमल शितोळे (कोहकडेवाडी) या महिला कुस्तीपटूस रोख 9 हजार 111 रुपये बक्षीस देण्यात आले आहे.