मंचर – नारोडी (ता. आंबेगाव) येथील श्री मुक्तादेवी विद्यालयात जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ, जुन्नर तालुका गणित अध्यापक संघ यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि गणित विषयाचे मार्गदर्शन जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल आणि जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने यांनी केले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबरोबर पाणीबचत, वीजबचत व हॉर्न बचत (दुचाकी चारचाकी गाड्यांच्या हॉर्न कमी वेळ वाजविणे) करावी, असे मत यावेळी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल यांनी व्यक्त केले. जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने यांनी भूमितीतील अवघड भाग सोपा करून सांगितला.
प्रमेयांची उजळणी, समरूप त्रिकोणाची रचना, प्रत्येक पाठासाठी अभ्यासक्रमावर आधारित आणि पाठ्यपुस्तकात नसणारी अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांच्या मदतीने सोडवून घेतली. याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य चंद्रकांत घोडेकर व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शरद घोडेकर, विज्ञान शिक्षक नामदेव डोके यांसह शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.