बेंगळूरू – बेंगळुरूतील तंत्रज्ञान विषयक एरोनिक्स इंटरनेट कंपनी या कंपनीतील माजी कर्मचाऱ्याने तलवारीने वार करून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूतील अमृताहल्ली भागातील कंपनीच्या कार्यालयामध्ये घुसून या कर्मचाऱ्याने दोन्ही अधिकाऱ्यांवर तलवारीने वार केले आणि त्यानंतर तो पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले.
फणिंद्र सुब्रमण्य (एमडी) आणि विणू कुमार (सीईओ) अशी हत्या झालेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत. रुग्णालयात नेले जात असताना दोघांचा मृत्यू झाला. फेलिक्स नावाच्या माजी कर्मचाऱ्याने त्यांच्यावर तलवारीने वार केले होते. तो सध्या फरार आहे.
फेलिक्सने अलिकडेच एरोनिक्स इंटरनेट कंपनीतील नोकरी सोडली होती आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र फणिंद्र यांनी त्याच्या व्यवसायाला जोरदार विरोध केला होता. याचा फेलिक्स याच्या मनात राग होता. फेलिक्सने आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या कार्यालयामध्ये घुसून फणिंद्र आणि विणू कुमार यांच्यावर तलवारीने वार केले आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.