शेओपूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आणखीन 2 नर चित्ते सोडण्यात आले आहेत. यामुळे या अभयारण्यामधील चित्त्यांची एकूण संख्या आता 12 झाली आहे, असे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नामिबियातून आणलेले 5 मादी आणि 3 नर असे एकूण 8 चित्ते पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला कुनो अभयारण्यामध्ये सोडण्यात आले आहेत.
त्यानंतर यावर्षी 18 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून आणखीन 7 नर आणि 5 मादी असे एकूण 12 चित्ते आणण्यात आले आहेत. यातील प्रभाष आणि पावक हे दोन नर चित्ते अभयारण्यामध्ये सोडण्यात आले आहेत, असे शेओपूरच्या विबागीय वन अधिकारी पी.के. वर्मा यांनी सांगितले. अजून 5 मादी चित्ते आणि एक बछडा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
ज्वाला नावाच्या मादीचा बछडा आणि अन्य 6 चित्त्यांचा मार्च महिन्यापासून मृत्यू झाला आहे. ज्वाला या मादीने मार्च महिन्यात 4 बछड्यांना जन्म दिला आहे. बारतातील अखेरच्या चित्त्याचा 1947 मधये तेंव्हाच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय चित्ता देशभरातून नामशेष झाल्याचे 1952 साली घोषित करण्यात आले होते.