208 वडगावशेरी
मी महाआघाडीचा उमेदवार असलो, तरीदेखील पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच शिवसेनेची चांगली मदत झाली. मतदार संघातील वाहतूक, पाणी, झोपडपट्ट्यांचा विकास, बेरोजगारी आणि वैद्यकीय सुविधांचे सक्षमीकरण या पंचसूत्रीवर भर देणार आहे.
– सुनील टिंगरे, वडगावशेरी विधानसभा मतदार संघ
209 शिवाजीनगर
विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यातून मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून, कामाची संधी दिली आहे. जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करुन नागरिकांचा विश्वास सार्थ करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
– सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ
210 कोथरुड
कोथरूडकरांनी दिलेला जनादेश मी आदरपूर्वक स्वीकारतो. मताधिक्य कितीही असले तरी कोथरूड आणि पुण्याचा विकास करीन, त्यासाठी कटीबद्ध असल्याचा प्रत्यय तुम्हाला लवकरच येईल.
– चंद्रकांत पाटील, कोथरुड विधानसभा मतदार संघ
211 खडकवासला
किती कमी किंवा अधिक मतांनी मिळविलेला विजय हा शेवटी विजय असतो. माझ्या मतदार संघात शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भाग येतो. या मतदार संघामधील विकासकामांकरिता बाराशे कोटी रुपयांचा निधी आणला. या भागातील विकास समतोल साधल्यानेच मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी दिली. आता माझ्या मतदार संघातील वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा माझा मानस आहे.
– भीमराव तापकीर, खडकवासला विधानसभा मतदार संघ
212 पर्वती
लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत मताधिक्य सर्वच मतदारसंघात घटले आहे, ही बाब अनपेक्षित आहे. मतदारांनी दिलेला कौल मान्य असून जनतेची कामे करताना आम्ही कुठे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण करू. पर्वती मतदार संघात मला गेल्यावेळी 70 हजारांचे मताधिक्य होते. यावेळी त्यात वाढ होईल, असा अंदाज होता. मात्र, तसे झाले नाही. मध्यंतरी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मतदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळे मताधिक्य घटले. ते का घटले, याची माहिती घेऊनच भाष्य करणे योग्य ठरेल.
– माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभा मतदारसंघ
213 हडपसर
माझ्या विजयात मतदार संघातील ज्ञात, अज्ञात हितचिंतकांचा व माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कचऱ्याच्या ठेक्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधींची भागीदारी असल्याने शहराचा कचरा हडपसरच्या माथी मारला आहे. आता हा कचरा हडपसरमध्ये येऊ देणार नाही. तसेच, मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि रखडलेले हज हाऊसचे काम प्राधान्याने मार्गी लावणार आहे. माझ्या या विजयाने माझे वडील खासदार
स्व. विठ्ठलराव तुपे यांचे स्वप्न साकार झाले आहे.
– चेतन तुपे, हडपसर विधानसभा मतदार संघ
214 पुणे कॅन्टोन्मेंट
देशात आणि राज्यात झालेल्या विकासकामांची पावती म्हणून मतदारांनी आपल्या निवडून दिले आहे. माझ्या विजयात भाजप, शिवसेना, रिपाइं तसेच महायुतीच्या घटक पक्षाचा मोलाचा वाट असून त्याबाबत मी सर्व पक्षांचा आभारी आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच्या सुनियोजित विकासावर आपला भर राहणार असून त्या अनुषंगाने काम केले जाईल.
– सुनील कांबळे, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ
215 पुणे-कसबा
कसब्यातील विजय हा भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आहे. जिंकून येण्यासाठी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. शहरातील भाजपचा पराभव झालेल्या 2 मतदारसंघात पराभवाचे चिंतन केले जाणार आहे. तसेच, राज्यात भाजप, शिवसेना व महायुतीतील घटक पक्ष सरकार स्थापन करणार आहेत.
– मुक्ता टिळक, कसबा विधानसभा मतदार संघ