नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय पंतप्रधानांचे कार्यालय आणि भारताच्या राष्ट्रपतींना ट्विटरवरून बेदखल म्हणजेच अनफॉलो केले आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासालाही त्यांनी अनफॉलो केले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी यावर नाराजी व्यक्त केले.
राहुल गांधी म्हणाले, “व्हाईट हाऊसने आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना ट्विटरवर अनफॉलो केल्यामुळे मी निराश आहे.” तीन आठवड्यांपूर्वी नरेंद्र मोदी हे अमेरिकन प्रशासनाने ट्विटरवर फॉलो केले जाणारे एकमेव राष्ट्रप्रमुख होते. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आहे,असे मानले जात होते. पण त्यांनी मोदींना असे अचानकच बेदखल केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याबाबत, व्हाईट हाऊसने बुधवारी स्पष्टीकरण दिले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान यजमान देशांच्या अधिकार्यांना ट्विटर अकाऊंटवर फॉलो करत असते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्यादरम्यान व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये अध्यक्ष रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, अमेरिकेतील भारतीय दूतावास, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना फॉलो केले होते. या आठवड्याच्या सुरूवातीस, व्हाइट हाऊसने या सर्व सहा ट्विटर हँडलला अनफॉलो केले.