पुणे (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी पुन्हा अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार १ ते ३ मे मध्यरात्रीपर्यंत तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. तसेच ७ पोलीस ठाण्याअंतर्गत कोरोना संक्रमित भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत. अशी माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी तीन दिवस अतिरिक्त निर्बंध लागू केल्यामुळे १ मे सकाळी सहा वाजल्यापासून ३ मे रात्री १२ वाजेपर्यंत अतिरिक्त निर्बंध लागू केलेल्या ठिकाणी किराणा, भाजीपाला, फळे, चिकन मटण, अंडी यांची विक्री, दुकाने, वितरण सेवा पूर्ण बंद ठेवली जाणार आहेत. तर दूध विक्री केंद्र दिवसभरात फक्त सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. घरपोच दूध वितरणासाठी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वेळेच बंधन घालण्यात आले आहे. त्यामध्ये समर्थ पोलिस ठाणे, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व दुकाने तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत.