थेऊर, (वार्ताहर) – येथील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला विलू पुनावाला ट्रस्टकडून शुद्ध पाण्याचा आरो भेट देण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील तब्बल 200 विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा आरोग्यदूत पै. युवराज काकडे यांनी दिली.
याचा लोकार्पण व उद् घाटन सोहळा ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीचे क्षेत्र-व्यवस्थापक निलेश रामेकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे, चिंतामणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, शाळेचे मुख्याध्यापक राहुल घुले, आबासाहेब कांबळे, रामदास चव्हाण, रामदास वाघमारे, सोनिया आढावतकर, कुमोदिनी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले, गेली अनेक दिवसांपासून विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल घुले यांनी वेळोवेळी थेऊर ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन विद्यालयास आरो मशीन उपलब्ध झाले आहे. यावेळी आदर पूनावाला टीमसह गावातील सर्वांचेच यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.
दरम्यान, या आरो मशीनच्या माध्यमातून विद्यालयास, दररोज 500 लिटर शुद्ध फिल्टर केलेले पाणी मिळणार आहे. बटन दाबल्यानंतर विध्यार्थ्यांना 100 मि. ली. पासून 1 लिटर पर्यंत पाणी मिळणार आहे. हडपसर येथील सिरम कंपनीमधून फिल्टर केलेले पाणी, विद्यालयात दररोज येऊन भरले जाणार आहे.
आरो मशीनच्या पाण्याची पातळी 20 टक्केपर्यंत गेल्यास, अॅटोमॅटिक सेन्सरच्या माध्यमातून, सिरम कंपनीस याची माहिती मिळेल, माहिती मिळाल्यानंतर काही वेळात, कंपनीच्या टँकरमधून आरो मशीनला पाणी पुरवठा होणार आहे.