उरुळी कांचन, (वार्ताहर) – भांडणाच्या उद्देशाने लाकडी दंडुके घेऊन फिरणार्या 8 जणांवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील अस्मिता हायस्कूलसमोर ही घटना घडली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून दोन दुचाकींसह 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विकास उर्फ आबा लक्ष्मण तरंगे (वय 22, रा. दत्तवाडी, उरूळी कांचन), गणेश कुंभार (बाजार मैदान, उरूळी कांचन), आप्पा लोंढे (रा. गोळे वस्ती, उरूळी कांचन), सोनु सातव (रा. भवरापूर), महेंद्र गाडे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), प्रेम अडसुळ (रा. आर जीवन बँकेसमोर, उरूळी कांचन) व दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुले (रा. सोरतापवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी उरूळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे. उरुळी कांचन येथील बायप रस्त्यावर काही जण हातात पाईप व लाकडी काठ्या घेऊन भांडणे करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा पोलिसांना तिघेजण पाईप व लाकडी काठ्या घेऊन दुचाकीवरून फिरताना आढळून आले. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना ताब्यात घेतले. तर 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.