थेऊर, (वार्ताहर) – अष्टविनायकापैकी मानाचे स्थान असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील परिसरात काही अल्पवयीन मुले – मुली हुक्का ओढताना आढळून आल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलीस याबाबत काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पालक आपल्या पाल्यांबाबत मोठी स्वप्न बघून उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील व सतर्क असताना परिसरात व्हायरल झालेल्या व्हिडीओने पालक वर्गाची चिंता वाढवली आहे. पोलीस आयुक्तांनी भाईगिरी’ व बेकायदेशीर धंद्याबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. त्याबाबत पोलिस स्टेशनला आदेश पारित केलेले आहेत,
मात्र तरीदेखील थेऊर परिसरात हुक्का ओढतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पोलीस काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
थेऊर परिसरात सुरु असलेल्या या अवैध व्यवसायाला कोण पाठबळ देतोय ?असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जाऊ लागला आहे. जुगार, मटका, हुक्का पार्लर अशा अवैध धंद्यांना बंदी असताना हे व्यवसाय राजरोसपणे कसे काय सुरू आहेत हाही प्रश्न उपस्थित होत आहे.