पुणे – महापालिकेकडून शहरात समान पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना डहाणूकर कॉलनी, गोसावी वस्ती येथे खोदाईत महावितरणाची वीज वाहिनी तुटल्यानंतर ती निकृष्ट साहित्य वापरून दुरूस्त करण्यात आली. मात्र, याच वाहिनीवर पाण्याची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही बाब लक्षात येताच महावितरणने पालिका प्रशासनाला तत्काळ पत्र पाठवून जलवाहिनी तातडीने महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्यांखालून टाकण्याची सूचना केली आहे. तसेच, या प्रकारामुळे लोखंडी जलवाहिनीत विद्युत प्रवाह उतरून अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
खोदाईचे काम करण्यापूर्वी ठेकेदारास त्या दाखविण्यात आल्या होत्या, त्यानंतरही मध्यरात्री खोदाई करताना दि. 28 मार्चच्या रात्री 11:30 वाजता खोदाई करताना वारजे भागास वीज पुरवठा करणारी एनडीए फिडरची 22 केव्ही क्षमतेची भूमिगत वीज वाहिनी तुटली. परिणामी, वारजे परिसरात सुमारे 4 तास वीज पुरवठा खंडीत झाला, त्यानंतर महावितरकडून पर्यायी यंत्रणेद्वारे पुरवठा सुरळीत करत ठेकेदारास केबल दुरूस्त करून देण्यास सांगण्यात आले. मात्र, ठेकेदाराकडून दुरूस्तीचे कामही निकृष्ट करण्यात आले शिवाय वीज वाहिन्यांच्या वरून जलवाहिनी टाकण्याचे काम केले आहे.