कारसह तिघे बुडाले; गावकऱ्यांनी सांगूनही सूचनेकडे केले दुर्लक्ष

पुणे – जोरदार पावसामुळे जांभुळवाडी दरी पुलाजवळील केळेवाडीतील नाल्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह होत होता. खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी दुचाकी वाहने आडवी लावून नाल्यावरील पुलाकडे जाणारा रस्ता अडवला होता. मात्र, वॅगनआर कारमधून आलेल्या तरुणांनी गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करत तेथील दुचाकी वाहने हटवली आणि कार नाल्याकडे दामटली. मात्र, ही कृतीच त्यांच्या जीवावर बेतली. कारसह तिघे तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. इतर मुलांचा शोध पीएमआरडीएचे अग्निशमन पथक घेत आहे.

निखिल दिनेश चव्हाण (21), साईनाथ ऊर्फ गणेश तुकाराम शिंदे (22), सूरज ऊर्फ बाबू संदीप वाडकर (20, तिघेही रा. संतोषनगर, कात्रज) अशी पाण्यात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. यातील एका तरुणाला अवघ्या 2 महिन्यांची मुलगी आहे. यातील सूरजचा मृतदेह जांभुळवाडी तलावात पीएमआरडीएच्या अग्निशमन दलातील जवानांना मिळाला.

पावसामुळे केळेवाडी येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत होता. हा पूल वाहतुकीचा असल्याने खबरदारी म्हणून गावकऱ्यांनी दोन्ही बाजूने दुचाकी लावून रस्ता अडवला होता. जेणेकरून कोणताही वाहनचालक चुकून तेथे जाऊ नये. तसेच, काही गावकरीही तेथे थांबून वाहनचालकांना मार्गदर्शन करत होते. तर हे तरुण हॉटेलमधून जेवण करून “वॅगनआर’ कारने घरी चालले होते. केळेवाडी पुलाच्या तिथे आल्यानंतर या तरुणांना गावकऱ्यांनी समजावून सांगितले होते. मात्र, त्यांनी गावकऱ्यांचे न ऐकता दुचाकी वाहने बाजूला सारून पुलावर कार घातली. यामध्ये तिघेही गाडीसह बुडाले. त्यांना नागरिक संतोष गायकवाड, विनोद वरपे, निलेश शिंदे, राजेश कदम यांनी बोटीने त्यांचा मृतदेह काढला. यासाठी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलानेही प्रयत्न केले.

नऱ्हेतील तरुणाचा मृतदेह नाल्यात सापडला
पावसामुळे भिंत कोसळून वाहून गेलेल्या मुकेश हरिदास गाडिलवाल (28, रा. नऱ्हे) यांचा मृतदेह पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या पथकाला मिळाला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. गाडिलवाल हे 25 सप्टेंबर रोजी भिंत पडल्यानंतर नाल्यात वाहून गेले होते. घटनास्थळापासून पुढे 8 किलोमीटरवर त्यांचा मृतदेह मिळाला. जवानांनी रोप टाकून त्यांचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे अधिकारी विजय महाजन यांनी दिली.

कोंढव्यातही मृतदेह सापडला
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगमधील एका मयत व्यक्‍तीचा मृतदेह वानवडी बाजार पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये गंगा सॅटटेलाइट समोरील ओढ्याजवळ आढळून आला. धर्मनाथ मातादीन भारती प्रसाद (रा. कोंढवा बुद्रुक, मूळ. रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी या व्यक्‍तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत आहे. अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सी. एम. मछले यांनी दिली. याप्रकरणी मयत दाखल करून पुढील तपास कामी कोंढवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पावसामुळे केळेवाडी ओढा येथून तीन व्यक्‍ती पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली होती. पीएमआरडीएचे अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके घटनास्थळी दाखल झाली. केंद्र प्रमुख सुजित पाटील व उपअग्निशमन दल अधिकारी विजय महाजन यांच्यासह दहा-दहा जणांची पथके नऱ्हे मानाजीनगर व जांभुळवाडी येथील घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी दोघांचेही मृतदेह 38 ते 40 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले.
– विजय महाजन, अधिकारी, पीएमआरडीए अग्निशमन दल

Leave A Reply

Your email address will not be published.