प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ
कवठे – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजाकात उगवलेले गवत काढून टाकून ते चकाचक झाले. सेवा रस्त्यांच्या व महामार्गाच्या कडेला विद्युत खांब बसवून झाले. त्यामुळे दुरून पाहताना महामार्ग शोभिवंत दिसत असला तरी वाई तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या पट्ट्यात आणि सेवा रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डेच खड्डे पडल्याने प्रवासी मेटाकुटीला येत आहेत. काही ठिकाणी महामार्ग व सेवा रस्त्यांचे काम राहून गेले असले तरी महामार्ग प्राधिकरणाकडून काहीही उपाययोजना होत नाहीत. सेवा रस्त्यांची दुर्दशा प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दाखवूनसुद्धा सरकारला जाग येत नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
ग्रामस्थांनी केला कच्चा सेवा रस्ता
कवठे येथे देशभक्त किसन वीर स्मारकासमोर सेवा रस्ता अस्तित्वात नसल्याने तेथे अपघात होत आहेत. महामार्गाच्या विरुद्ध दिशेच्या लेनवरून दुचाकी, चारचाकी वाहने सेवा रस्ता नसलेल्या ठिकाणाहून जाताना अपघात होत आहेत. पावसाळ्यात या मार्गावरील रहदारी बंद असते. ग्रामस्थ मुरूम टाकून या सेवा रस्त्याची तात्पुरती डागडुजी करतात. ग्रामसभांमध्ये ठराव करूनसुद्धा त्यात काहीही बदल झालेला नाही. हा सेवा रस्ता गेले कित्येक वर्षे तयार करायचा राहून गेला आहे. ग्रामस्थांनी आपल्या सोयीसाठी बनविलेल्या कच्च्या रस्त्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकते. यावर महामार्ग प्राधिकरणाने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गुडघाभर पाण्यातून प्रवास
सुरूर येथील शिवाजी विद्यालय व कॉलेजसाठी असलेला अंडरपास खड्ड्यात असल्याने दोन्ही सेवा रस्त्यांवरून पावसाचे पाणी अंडरपासमध्ये येऊन साठत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. याकडेही प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सुरूर बाजारातील अंडरपास जलमय
सुरूर बाजारासमोरील अंडरपाससुद्धा खड्ड्यात असल्याने पावसाळ्यात जलमय होत आहे. येथे नेहमीच अंधार असल्याने ग्रामस्थ मलमूत्र विसर्जनासाठी याचा वापर करत आहेत. त्यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायतीने आता या पुलाच्या तोंडावर बल्ब बसविले आहेत तरीसुद्धा महिला, मुली व लहाने मुले रात्री या अंडरपासचा वापर करण्यास धजावत नाहीत.
सुरूर उड्डाणपुलावरील पुणे-सातारा या लेनवरील रेलिंग तुटले असून महामार्गावरून एखादी गाडी अनियंत्रित झाली तर ती सरळ उड्डाण पुलावरून सेवा रस्त्यावर आदळण्याची भीती आहे. त्यामुळे तेथे नव्याने रेलिंग बसवावे, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करत आहेत. बदेवाडी हद्दीतील सेवा रस्त्यांची दुरवस्था बदेवाडी येथील नवीन उड्डाण पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आली होती. अवजड वाहनांमुळे सेवा रस्ते खराब झाले होते. त्यांची वारंवार डागडुजी करण्यात येत होती. मात्र, उड्डाण पूल सुरू झाल्यावर सेवा रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सातारा-पुणे लेनवरील सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या सेवा रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी माती पसरली आहे. या सेवा रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाल्यास स्थानिक प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
किसन वीर स्मारकात साठतंय पाणी
किसन वीर स्मारक महामार्गालगत असून स्मारकातील शंभर फूट रुंद व तीनशे फूट लांब जागा महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यासाठी घेतली आहे. ते पाणी वाहून जाण्यासाठी गटारे नसल्याने पावसाचे महामार्गावरून येणारे पाणी आणि बाजूच्या शेतातील सर्व पाणी या स्मारकात साठते.