फास्टॅगचा वापर वाढला

जुलै महिन्यात 8 कोटी 60 लाख व्यवहार

नवी दिल्ली – महामार्गावर टोल देण्यासाठी रोखीने व्यवहार करण्याऐवजी फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा वापर वाढत असून जुलै महिन्यामध्ये 8 कोटी 60 लाख व्यवहार फास्टॅगच्या माध्यमातून झाले.

यातून 1,623 कोटी रुपयांचे टोल संकलन करण्यात आले. जून 2020 मध्ये 8 कोटी 19 लाख व्यवहार फास्टॅगच्या माध्यमातून झाले होते. त्यातून जमा करण्यात आलेली रक्कम 1,511 कोटी रुपयांची होती. याचा अर्थ लॉकडाऊनमधून वाहतूक व्यवस्था आता बाहेर पडू लागली असून आगामी काळामध्ये सर्व परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे.

फास्टॅग यंत्रणा चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी महामार्गावर ही यंत्रणा वाहनधारकांनी वापरावी यासाठी जास्त आग्रही भूमिका रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतली आहे. त्याला योग्य प्रतिसाद मिळत आहे दरम्यानच्या काळामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रोख पैसे देण्याऐवजी फास्टॅगच्या माध्यमातून टोल देणे अधिक लोकप्रिय होऊ लागले असल्याचे दिसून येते. सुरुवातीला वाहनधारकांना ही पद्धत समजून घेण्यास वेळ लागला. आता वाहनधारक या पद्धतीने व्यवहार करू लागले आहेत. त्यामुळे टोल प्लाझावरील गैरमार्गाला आळा बसत आहे.

राज्य महामार्ग, शहरातही अंमलबजावणी
महामार्गावर फास्टॅगद्वारा टोल संकलन वाढू लागले आहे. त्यामुळे आता ही यंत्रणा राज्यांच्या महामार्गावर, त्याचबरोबर शहरातील टोल प्लाझावर लागू करण्याच्या शक्‍यतेची पडताळणी करण्यात येत आहे. शहरातील पार्किंग लॉटमध्येही पार्किंग शुल्क फास्टॅगच्या माध्यमातून संकलित करण्याची यंत्रणा तयार केली जात आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही पद्धत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.