औद्योगिक उत्पादनावर परिणाम कायम

नवी दिल्ली – मॅन्युफॅक्‍चरिंग, खाण आणि ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्यामुळे जून महिन्यात एकूणच औद्योगिक उत्पादन 16.60 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. या महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 17.10 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. ऊर्जा क्षेत्राची उत्पादकता 19.40 टक्‍क्‍यांनी, तर खाण क्षेत्राची उत्पादकता 10 टक्‍क्‍यांनी घसरली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनचा अजूनही औद्योगिक उत्पादनावरील परिणाम संपुष्टात आलेला नाही. मात्र, गेल्या वर्षातील जून महिन्याच्या तुलनेत या जून महिन्याच्या आकडेवारीची तुलना करणे बरोबर नाही असे मंत्रालयाने म्हटले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांच्या तुलनेत जून महिन्यातील औद्योगिक उत्पादन बरेच वाढले आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या आकडेवारीची तुलना केल्यानंतर औद्योगिक उत्पादनात घट दिसून येते.

वाहन विक्री बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे जुलैपासून औद्योगिक उत्पादन पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. मार्चअखेरीस लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे मोठ्या शहरातील नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. त्याचा परिणाम साहजिकच अपेक्षित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.