देशातील पाणीसाठ्याची माहिती आता ऑनलाइन

जलसाठ्यासह अन्य माहितीही मिळणार

पुणे – देशात धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती आता नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहे. त्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने “इंडिया वॉटर रिसोर्स इन्फर्मेशन सिस्टिम’ प्रणाली विकसित केली आहे. या संकेतस्थळावरील माहिती “जीआयएस प्लॅटफॉर्म’वर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे धरणातील दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पाऊस आदींची माहिती रियल टाइम माहिती मिळणार आहे. याचसह धरणाचे पाणलोट क्षेत्र, लाभक्षेत्र, कालवे, जलविद्युत प्रकल्प इत्यादी माहिती मिळणार आहे.

जलशक्ती मंत्रालयाने ही माहिती https://indiawris.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. 2008 पासून या संकेतस्थळाचे काम सुरू होते. नुकतेच या प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून यामध्ये नवीन माहिती आणि कार्यप्रणालीचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील जलसिंचन प्रकल्पांची ठळक वैशिष्टे, लघु पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, नदीजोड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या लिंक, तसेच जलवाहतूक करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या लिंक्‍स जीआयएस नकाशावर पहाता येणार आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे पाणथळ, तसेच क्षारपड झालेल्या जमिनीची माहिती, धरणात साठलेल्या गाळाची माहिती मिळणार आहे. याचसह देशातील भूजल पातळी, त्यांची गुणवत्ता आणि जललेखा याबाबतची माहिती मिळणार आहे.

देशातील नदी खोरे, उपखोरे, जलाशय, पाणथळ जमीनी, बर्फाचे तलाव, समुद किनारपट्टीबाबत माहिती आणि जल पर्यटन ही मिळणार आहे. देशातील जमीनीचा प्रकार, त्याचा वापर, वापरायोग्य नसलेली जमीन, सामाजिक-आर्थिक माहिती, जमिनीचा ऱ्हास, मातीचे प्रकार आणि कृषी- अर्थव्यवस्था आणि कृषी-हवामान याबाबतची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.