FASTag | रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर टोल भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फास्टॅग सेवेतून पेटीएमला वगळण्यात आले आहे. पेटीएम बँकेच्या ऐवजी आता त्या ठिकाणी इतर नऊ बँकांसोबत करार करण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स बँकेला 15 मार्चनंतर ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे एनएचएआयला ही व्यवस्था करावी लागली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक देशभरातील 247 टोल प्लाझाच्या टोल संकलनाचे व्यवस्थापन करते. ती या टोल प्लाझासाठी ॲक्वायर बँक म्हणून काम करते.
एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सांगितले की इतर 9 बँका पेटीएम पेमेंट्स बँकेची जागा घेतील. या बँकांद्वारे सर्व 247 टोल प्लाझावर पेमेंट केले जाऊ शकते. पेटीएम पेमेंट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या या 247 टोल प्लाझांचा दैनंदिन टोल संकलनात 190 कोटी रुपयांचा वाटा आहे. एकूण टोलवसुलीच्या हे प्रमाण 14 टक्के आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेऐवजी एनएचएआयच्या भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीने ॲक्सीस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेची निवड केली आहे. हे सर्वजण टोल सेवेचा व्यवसाय सांभाळतील. ते सर्व ॲक्वायर बँक म्हणून काम करतील.
आरबीआयचा पेटीएमला दिलासा –
दुसरीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमला आज मोठा दिलासा दिला आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंध लागू करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 29 फेब्रुवारीपासून नव्हे तर 15 मार्चनंतर निर्बंध लागू करण्यात येणार आहे. याचा अर्थ पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यांमध्ये 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील.