झापवाडी येथे आळेफाटा पोलिसांची कारवाई
बेल्हे -झापवाडी (ता. जुन्नर) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि. 23) पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास झापवाडी गावचे हद्दीतील एका वस्तीवरील घरावर पाच दरोडेखोर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात होते. घराताल लोकांना जाग आल्याने त्यांनी उठून आरडा ओरडा केला. यावेळी दरोडेखोरांनी घरावर दगडफेक करून व दहशत निर्माण करून मंगरुळ गावाकडील वनहद्दीकडे दोघे पळून गेल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले.
या घटनेची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिली. पोलिसांनी तात्काळ गावातील चारही रस्त्यावर नाका-बंदी करून त्यापैकी एक मोटर सायकलचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले. अन्य एकजण जंगलात पळून गेला. पोलिसांनी पकडलेल्या दोघांकडे कटावणी, कोयता, मोसा व इतर दरोड्याचे साहित्य असे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या सोबतचे पळून गेलेले इतर तिघांची नाव निष्पन्न झाली आहेत.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस हवालदार भोईर, पोलीस नाईक संदीप फड, कॉन्स्टेबल गोरक्ष हासे, मोमीन, समाधान अहिवळे, होमगार्ड शिरतर यांच्या पथकाने केली.