भोर -तीन महिन्यांपासून भोर नगरपालिका प्रशासनाने शहरात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवूनही अखेर करोनाने शहरात शिरकाव केला असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
शहरातील नागोबा आळी येथील एका पुरूषाचा, तर रामबाग येथील एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.
शहरात बाजारहाटच्या नावाखाली ग्रामीण भागातील नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, प्रशासन आणि पोलीस स्टेशनने दखल घेऊन नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश देऊनही गर्दी कमी होत नसल्याने अनेक नियमावली तयार करूनही आणि करोनाला रोखण्यासाठी विविध प्रयत्न करूनही (दि. 17) शहरात करोनाने शिरकाव केला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच दोन बाधित व्यक्ती आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
तीन दिवसांत तालुक्यात सुमारे 200 मिमीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवला आहे. उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरू केले असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली आहे.