विकासकामांना कात्री : प्रभागातील “प्लॅनिंग’ धोक्यात
पुणे – विकासकामांना कात्री लागल्याने सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक नाराज झाले आहेत. यामुळे नगरसेवकांचे प्रभागातील “प्लॅनिंग’ही धोक्यात आले आहे.
अंदाजपत्रकात तरतूद करताना कायमच सत्ताधारी नगरसेवकांना झुकते माप दिले जाते. त्या न्यायाने स्थायी समिती अध्यक्षांनी अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केले आणि ज्यांना जास्त तरतूद मिळाली त्यांच्या आनंदावर मार्चमध्येच करोनाच्या प्रादुर्भावामुळे विरजण पडले. आता उपचारासाठीच पैसा उभा करायचा असल्याने 10 टक्के विकासकामांना कात्री लागणार आहे. त्यातून ज्यांना जास्त तरतूद आहे, त्यांनाच याची झळ बसल्याने आणि प्रभागात कामे करता येणार नसल्याने नगरसेवक नाराज झाले आहेत.
आता महापालिकेच्या मुख्य उत्पन्न स्रोत असलेल्या मिळकत करविभागाचे उत्पन्न घटले आहे. बांधकाम विभागाला गेल्या दोन महिन्यांत केवळ एक कोटी उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळेच आयुक्तांनी विकास कामांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरूवात म्हणून मंगळवारी स्थायी समितीने करोना उपचारासाठी 200 कोटी रुपयांच्या वर्गीकरणांना मंजुरी दिली.