विक्रेते नाराज : पोलीस बळाचा वापर होत असल्याची तक्रार
आळंदी : महसूल विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी यात्रा नियोजन बैठकीत आळंदीतील अतिक्रमणमुक्त पदपथ व नदी घाट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा राज्यातील हजारो व्यावसायिकांना फटका बसत आहे. पोलीस बळाचा वापर केला जात असल्याची पथारीचालकांची तक्रार आहे. या निर्णयामुळे आळंदीतील कार्तिकी यात्रेतील कोट्यवधी रूपयांच्या होणाऱ्या आर्थिक उलाढालीलाच खीळ बसली आहे. तर ग्रामस्थांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
श्री क्षेत्र अलंकापुरीत आषाढी व कार्तिकी या दोन वाऱ्या मोठ्या प्रमाणावर भरतात. मोठ्या श्रद्धने लाखो भाविक माऊलींच्या चरणी लिन होण्यासाठी येत असतात. या दोन्ही वारींपैकी कार्तिकीवारीत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दोन वर्षे करोनानंतर निर्बंधमुक्त कार्तिकीवारी भरत असल्याने राज्यभरातील हजारो विक्रेते मोठ्या आशेने अलंकापुरीत चार दिवसांपूर्वीच दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी नगरपरिषद प्रशासनाला केवळ नावापुरते सोबत घेत, अतिक्रमणविरोधी कारवाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
नगरपरिषदेने लिलाव केलेल्या जागा वगळून अन्य ठिकाणी पथारीचालकांना हटविण्यात आले. तर बैठकीतील निर्णयामुळे नगरपरिषदेच्या प्रदक्षिणा रस्त्यालगतच्या जागांचा लिलावच नगरपरिषद प्रशासनाने करणे टाळले आहे. कारवाईत पोलिसी बळाचा मुक्त हस्ते वापर केला जात आहे. याचा फटका मात्र राज्यातून दाखल झालेल्या हजारो विक्रेते व व्यापाऱ्यांना बसत आहे. दुकाने सजली नसल्याने आता आळंदीकरांना अपेक्षित असलेली यात्रा भरणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी, या यात्रेत होणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.
यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी रस्ता मोकळा पाहिजे. पदपथावरील अतिक्रमण हटविण्याबाबत नगरपरिषदेने उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार पोलीस काम करीत आहेत. आळंदी यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत.
-अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त
आळंदी कार्तिकी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांबरोबरच दाखल होणारे खेळणी विक्रेते, पथारीचालक व विक्रेतेदेखील या सोहळ्याचा एक भाग आहेत. त्यांच्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते, अडथळा होत असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. या यात्रेत दोन दिवस चांगला व्यवसाय होत असल्याने, त्यांना प्रदक्षिणा रस्त्यालगत व्यवसायाची परवानगी असावी.
– बाबा कांबळे, अध्यक्ष, टपरी, पथारी, हातगाडी पंचायत.
प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या निर्देशानुसार आळंदी यात्रेदरम्यान शहरातील पदपथ व नदीघाट अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. तर या विक्रेत्यांना व्यवसायाकरिता शहरातील चार ठिकाणी हॉकर्स झोन उपलब्ध करून दिले आहेत.
– सचिन गायकवाड, सहायक रचनाकार, आळंदी नगरपरिषद.