नेवासा – बेकायदा ऊस वाहतूकप्रकरणी जिल्ह्यातील 16 सहकारी साखर कारखान्यांना प्रादेशिक परिवहन खात्याने नोटिसा बजावून आदेशाचे पालन करण्यास बजावले आहे. याबाबत राज्य मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेने नाशिकच्या क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले होते.
यंदाच्या गळीत हंगामात ऊस वाहतुकीसाठी साखर कारखानदारांनी सध्या मोठ्या प्रमाणात ट्रकऐवजी डबल ट्रॅक्टर ट्रॉलीचा उपयोग सुरू केला आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक परिवहन खात्याकडून मान्यता नसलेल्या अनधिकृत गाडीला दोन चाके लावून त्याच्याद्वारे ऊस वाहतूक केली जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सर्रास सुरू आहे. याबाबत राज्य मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेने नाशिकच्या क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले होते.
त्यामुळे जिल्ह्यातील 16 सहकारी साखर कारखान्यांना प्रादेशिक परिवहन खात्याने नोटिसा बजावून निर्देशांच्या सूचनेचे पालन करण्याचे आदेश परिवहन खात्याकडून देण्यात आलेले आहे. यंदाचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी ट्रॅकऐवजी डबल ट्रॉली ऊस वाहतूक सुरू केली. परिवहन खात्याकडून मान्यता नसलेल्या गाडीला दोन चाके लागून त्याला ट्रॅक्टरचे मुंडके जोडून बेकायदा ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे.
ही वाहतूक अनधिकृत असून, रस्त्यावर अपघात झाल्यास याला कोण जबाबदार असा सवाल वाहतूक संघटनेने नाशिकच्या क्षेत्रीय परिवहन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करून ही अवैध ऊस वाहतूक बंद करण्यात यावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव व आयुबभाई कच्छी यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात डबल ट्रॉली ऊस वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे परिवहन खात्यावर सर्वसामान्य जनतेचा रोष वाढत चालला आहे. त्यामुळे आता गांवपातळीवरही ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील काष्टी गावात ग्रामपंचायतीने फलक लावून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना चोप देण्याच्या सूचनेचा फलक लागून चांगलीच कानउघाडणी केली आहे.