तिसरा बिबट्या जेरबंद

पाथर्डी -तालुक्‍यातील शिरसाटवाडी येथील वडदरी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झाला आहे. आत्तापर्यंत वनविभागाने तीन बिबटे जेरबंद केले आहेत.
यापूर्वी जेरबंद झालेल्या दोन बिबट्यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने जेरबंद झालेले बिबटे नरभक्षक आहेत किंवा नाही, याची खात्री अद्याप होऊ शकलेली नाही.

आज जेरबंद झालेल्या बिबट्याच्या लाळेचे व रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. केळवंडी, मढी व करडवाडी येथील तीन बालकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वीस दिवसांत वनविभागाने तीन बिबटे जेरबंद केले आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी शिरसाटवाडीतील याच परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता.

आजही याच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. वडदरी परिसरात बिबट्याच्या हालचाली दिसून आल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कुत्र्याची दोन पिले ठेवण्यात आली होती. भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. शुक्रवारी दुपाररी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे व वनअधिकारी आर. बी. आल्हाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथून बिबट्याला पाथर्डी वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर नगर येथे वैद्यकीय चाचणीनंतर जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात त्यास पाठविण्यात आले आहे.

जेरबंद झालेला बिबट्या मादी आहे की नर व त्याचे वय किती आहे, याबाबत वनअधिकाऱ्यांकडून माहिती मिळू शकली नाही. जेरबंद झालेल्या बिबट्याला टेम्पोत घालून नगरकडे रवाना करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे, वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनअधिकारी आर. बी. आल्हाट, शेवगावचे वनअधिकारी पी. बी. वेताळ, अप्पा घनवट, पांडुरंग हंडाळ, विजय पालवे, बबन मंचरे, सुधाकर घोडके, नारायण दराडे, नौशाद पठाण, स्वाती ढोले, वर्षा गिते, लक्ष्मण मरकड, नानासाहेब आठरे, हरिभाऊ दहिफळे आदी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.