“ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या…”; शिवसेनेची भाजपवर सडकून टीका

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या विरुद्ध ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असा संघर्ष सुरु असून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी याच प्रकरणावरुन सोमय्या यांना सोमवारी आयोजित केलेला कोल्हापूर दौरा रद्द करावा लागल्यानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा  खेळ पाहायला मिळाला.  मात्र आता या वादामध्ये शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच महाराष्ट्र भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे.

‘ईडी’ शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ‘ईडी’ मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे. भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत, असे म्हणत शिवसेनेने किरीट सोमय्यांच्या आरोपाला गंभीरतेने  घेत नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवीत आहे. विरोधकांनी निर्माण केलेल्या दुर्गंधीमुळेही जनजीवन विस्कळीत होऊ शकेल. विरोधकांना राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळायचे आहे काय? एकदा तसे जाहीर करा म्हणजे झाले, असा टोलाही शिवसेनेने मुखपत्रातून लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ”ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला? हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत अशी मुश्रीफ यांना खात्री आहे, कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी ‘ईडी’चे नाव आहे.

मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.