संगमनेर – संगमनेरात चार रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य विभागाने शहरातील नायकवाडपुरा येथील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले होते. मात्र त्यास तेथील नागरिकांनी आक्षेप घेतल्याने हे काम बंद करण्यात आले होते. मात्र आज प्रशासनाने काही स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर सकाळपासून हे काम पुन्हा सुरू केले आहे. परिसरातील कॉलनी तसेच इमारतींमध्ये दिवसाअखेरीस 13 पथकांनी अडीच हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात हजारो लोकांचा जीव गेला आहे. संगमनेर शहरात तीन व आश्वी बुद्रुक येथे एक, असे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण राहात असलेल्या शहरातील दोन हजार 521 घरांमधील 13 हजार 227 व्यक्तींचे व आश्वी बुद्रुक येथील 426 कुटुंबांमधील एक हजार 929 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 16 पथके निर्माण केली आहे.
परिसरातील कॉलनी, इमारतींत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आश्वी बुद्रुक येथील 426 कुटुंबांमधील एक हजार 929 नागरिकांचे सर्वेक्षण शनिवारी पूर्ण झाले होते. मात्र शहरातील नायकवाडपुरा परिसरातील स्थानिक रहिवासी प्रशासनाला मदत करत नसल्याने शनिवारी सर्वेक्षण थांबवण्यात आले होते.
आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी नगरपालिका अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक नगरसेवकांशी सकारात्मक बैठक घेतली. नंतर आरोग्य विभागाने नायकवाडपुरा परिसरात दिवसाअखेरीस 13 पथकांद्वारे अडीच हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले. पहिल्या दिवसाच्या तपासणीत कोणत्याही प्रकारे अजाराचे लक्षणे असलेले व्यक्ती आढळून आले नाहीत. परंतु चौदा दिवसांत केव्हाही अशा प्रकारे लक्षणे निदर्शनास येण्याची शक्यता लक्षात घेता, दररोज सर्वेक्षणाचे काम सुरूच राहणार आहे.