राजगुरूनगर -येथे तहसीलदार कार्यालयात असलेल्या झुणका भाकर केंद्रात रविवार (दि. 5) पासून शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी तासाभरात 100 थाळी गरीब गरजू व्यक्तींनी सोशल डिस्टन्स ठेवून शिभोजन थाळी घेतली.
शिवसेनेच्या जिल्हा संघटक विजया शिंदे या पूर्वी येथे झुणका भाकर केंद्र यशस्वीरीत्या चालवत होत्या त्यांना शिवभोजन थाळी केंद्र देण्यात आले आहे. या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन नायब तहसीलदार मालती धोत्रे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, समन्व्यक गणेश सांडभोर, कैलास गोपाळे, तुषार सांडभोर, रामदास शिंदे, मंदार शिंदे उपस्थित होते. दररोज 12 ते 3 या वेळेत शिवभोजन थाळी नागरिकांना देण्यात येणार आहे. येथील केंद्रावर सोमवारपासून मोठी गर्दी होणार असून केवळ 100 थाळीला मान्यता आहे. परंतू या ठिकाणी येणाऱ्या इतर नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.
राजगुरूनगर शहरातील व परिसरातील गरीब गरजू नागरिकांची सात ते आठ हजार संख्या आहे. प्रशासने केवळ 100 थाळीला दिली असून ती अपूर्ण आहे. प्रांत, तहसीलदार यांनी येथील केंद्रात 400 थाळीला मान्यता द्यावी. लॉकडाऊनच्या काळात शिवभजोजनथाळी घेण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी.
– विजया शिंदे,
जिल्हा संघटक, शिवसेना