मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मैं अटल हूं’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार असल्याच्या घोषणेनंतर या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली होती. आता या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.ज्यामध्ये अटलजींसह लाल कृष्ण अडवाणी यांचा संवाद दाखवण्यात आला आहे.
‘मैं अटल हूं’चे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे.यामध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारींच्या भूमिकेत हुबहु दिसत आहेत. पंकज ज्या पद्धतीने बोलतात आणि राजकारण्यासारखे वागतात ते पाहून त्यांनी अटलजींचे पात्र किती आत्मीयतेने साकारले आहे याचा प्रत्येय येतोय.
टीजरमध्ये अटल-आडवाणी यांचा संवाद दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये अटलजी पाठीत वार करणाऱ्या राजकारणी मंडळींबाबत भाष्य करताना दिसत आहेत. ‘पक्षांच्या या दलदलीत कमल उमलावे लागेल’ असं विधान यावेळी अटलजी टीजरमध्ये करताना दिसत आहेत.
पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’चा हा टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या या टीझर व्हिडिओने चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.