parliament – विरोधी पक्ष जर संसदेत नसतील तर त्या संसदेला (parliament) काहीच अर्थ राहत नाही आणि संसदेचे कामकाज विना अडथळ्यांचे व्हायचे असेल तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या सहमती झाली पाहिजे असे मत लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांनी व्यक्त केले. संसदेत कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यास मनाई आहे.
अगदी पंतप्रधान सभागृहात आल्यावर घोषणा करणेही नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा सभागृहात येतात तेंव्हा सत्ताधारी बाकांवरून मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. त्या अनुशंगाने आचारी यांनी ही टिप्पणी केली.
एका प्रख्यात संकेतस्थळाच्या प्रतिनिधीशी बोलताना आचारी म्हणाले की, संसद सदस्यांनी सभागृहात काय करायला हवे आणि काय करू नये याचे लेखी नियम आहेत. त्यानुसार कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यास मनाई आहे. पंतप्रधान सभागृहात आल्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा देण्याची प्रथा आता सुरू झाली आहे.
इंदिरा गांधी यांच्या वेळी म्हणजे त्या पंतप्रधान होत्या, तेंव्हाही असा प्रकार होत नव्हता. त्यावेळी सत्ताधारी सदस्य टाळ्या वाजवायचे. अर्थात तेही चुकीचेच होते. पंतप्रधान असोत किंवा उपपंतप्रधान असोत ते सभागृहात आल्यावर टाळ्या वाजवणे किंवा घोषणा देणे नियमानुसार चुकीचेच आहे आणि एरव्हीही हा प्रकार आयोग्यच आहे.
तब्बल तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोकसभा सचिवालयात काम केल्यानंतर आचारी २०१० मध्ये निवृत्त झाले आहेत. ते म्हणाले आज संसदेत ज्या प्रकारचा गदारोळ होतो आहे तसे पूर्वी होत नव्हते. एखाद्या गोष्टीला विरोध कसा करायचा याचा संसद सदस्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांनी नियमांचे उल्लंघन न करता विरोध करणे अपेक्षित आहे.
नव्याने संसदेवर निवडून येणाऱ्यांना सभागृहाच्या नियमांची ओळख करून देण्यासाठी जी प्रक्रिया राबवली जाते त्यातही सुधारणा करण्याची गरज आहे. केवळ एक वेळा त्यांना माहिती देणे पुरेसे नाही तर त्यांना वारंवार नियमितपणे नियमांची माहिती दिली गेली पाहिजे तसेच अर्थसंकल्पासारख्या तांत्रिक विषयांवर बोलण्याच्या संदर्भात विशेष प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. संसदेच्या कामकाजातील अडथळे संपवण्यासाठी सध्या असलेले नियम पुरेसे असून सभागृहात अर्थपूर्ण चर्चा झाली पाहिजे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी अर्थपूर्ण चर्चा करून शक्य तेवढी सहमती तयार करण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.