मुंबई – महाराष्ट्राला हव्या आहेत तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपूरमधून मिळू शकतात.. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना दिली. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
आम्ही नागपूरला एकाकडून सीएसआरमधून 1 कोटी रुपये घेतले. त्यातून आम्ही 15 हजार पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या. आमच्याकडे एमईसीएमचा रेडिमेड गारमेंट झोन आहे. तिथे 1200 महिला काम करतात. महाराष्ट्राला हव्या आहेत तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपूरमधून मिळू शकतात. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना दिली. असे ते एका विांहनीशी बोलताना म्हणाले.
पीपीई किट्सची किंमत 1200 रुपये होती. त्या 650 रुपयांमध्ये मिळतात. त्याला मंजूरी मिळाली आहे. त्याबाबत सर्व अहवाल आहेत. पाहिजे असेल तर मुंबईत कमीतकमी 25 हजार प्रतिदिन प्रमाणे ताबडतोब 2 ते 3 लाख किट पाठवता येतील. पण मला वाटतं यात जी निर्णय घेण्याची जी पद्धत आहे त्यात सर्वजण एकमेकांना विचारतात. खरंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गरज असेल तर याबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावेत. तसेच महाराष्ट्रात अशाप्रकारे कोठे कोठे उपलब्ध होऊ शकेल? याबाबतही त्यांनी विचार करावा. विशेषतः आपल्याकडे सॅनिटायझर आहे. आपण अनेक साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी परवानगी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मी स्वतः आमच्या कारखान्यातून 1 लाख सॅनिटायझर बाटल्या मोफत वाटल्या. जे आधी 1200 रुपये लिटरला विकलं जायचं ते आता 400 रुपये लिटरने विकलं जातं. महाराष्ट्र सरकारने याची किंमत 500 रुपये ठेवली आहे. असं करुन आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती, नगरपालिका यांना वाटप केले. त्यामुळे आता सॅनिटायझर आणि पीपीई किटची कमतरता नाही. उलट मला सॅनिटायझरवाल्याने त्यांच्याकडे अधिकचं उत्पादन असल्याचं सांगितलं आहे, असं गडकरी म्हणाले.