शिरूर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने शिरूर तालुक्यातील नाभिक समाजाचे व्यवसाय गेले महिनाभरापासून बंद असल्याने कुटुंबाच्या गरजा भागवताना त्यांना मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाभिक समाजाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करुन प्रतिमहिना पाच हजार रुपये मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे.
त्याचबरोबर लॉकडाऊननंतर दुकानांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन नाभिक व्यावसायिक कारागीर यांना वैद्यकिय सेवेत जसे सुरक्षित किट, चष्मा, हॅंड ग्लोव्हज, ड्रेस दिला जातो तशी सुविधा पुरविण्याची व्यवस्था करून 50 लाखांचा विमा उतरवावा तसेच घर व दुकान भाडे, थकीत कर्जाचे हफ्ते व त्यावरील दीर्घ व्याज माफ करून नाभिक समाजाला मदत करण्याची मागणी नाभिक संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष गणपत क्षिरसागर यांनी शिरूरचे तहसिलदार यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी सचिव दत्तात्रय शिंदे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पंडीत, दादासाहेब साळुंके आदि उपस्थित होते.