मंचर – वडगाव आनंद-आळेफाटा (ता. जुन्नर) येथुन भरकटलेली तरुणी पुणे-नाशिक रस्त्यावरील अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी येथे अंधारात घाबरलेल्या अवस्थेत मंचर पोलिसांना दिसून आली. मंचर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन तिचा पत्ता विचारून तिला शुक्रवारी (दि. 7) पहाटे घरी सुखरूप सोडले. मंचर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे-नाशिक रस्त्यावरील अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी येथे 21 वर्षीय तरुणी गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. या दरम्यान मंचर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी नीलेश खैरे यांनी या तरुणीला गोंधळलेल्या अवस्थेत पाहिले. तात्काळ मंचर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार अंकलेश्वर भोसले यांच्याशी संपर्क साधून महिला पोलीस आणि इतर पोलीस बोलून घेतले. महिला पोलीस पूजा गारगोटे यांनी या तरुणीला विश्वासात घेऊन बोलते केले.
तिचे नाव व पत्ता जाणून घेतले असता तिने माया गेनभाऊ गागरे (रा. वडगाव आनंद, आळेफाटा) असा पत्ता सांगितला. पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी तात्काळ आळेफाटा (ता. जुन्नर) येथील पोलीस ठाण्याची संपर्क साधून पोलीस नाईक संदीप फड यांच्याकडून वडगाव आनंदच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधून संबधित तरुणीचा पत्ता विचारून तरुणी बेपत्ता झाली आहे का, याची खात्री केल्यानंतर या तरुणीला तिच्या वडगाव आनंद येथील घरी पोलीस नाईक राजेंद्र हिले, पोलीस शिपाई रमेश करंडे, पोलीस शिपाई सोमनाथ गवारी,महिला पोलीस शिपाई पूजा गारगोटे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे महिला पोलीस वैशाली भालेकर व पोलीस नाईक संदीप फड घेऊन गेले. तेथे या तरुणीला तिची आई सीताबाई गेनभाऊ गवारे यांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी पोलिसांच्या या कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले आहे.