नगर – जिल्हा परिषदेतील लिफ्टची आयुमर्यादा संपवूनही निधी नसल्याने दुरुस्ती करून ते चालविले जात आहे. आयुमर्यादा संपलेल्या लिफ्टमुळे जिल्हा परिषदेत एखादी दुर्घटना होण्याची भीती आता व्यक्त केली जात असून अनेकांनी आता लिफ्टचा वापर करणे बंद केलेले आहे.
जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीच्या बांधकामाच्या वेळी लिफ्टची सोय करण्यात आली होती. हे लिफ्ट 2005च्या दरम्यान बसविण्यात आलेले आहे. तेव्हापासून ते सुरु आहे. मात्र या लिफ्टची आयुमर्यादा दहा वर्षांची होती. ती संपून अनेक सुमारे चार वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. तरीही जुनेच लिफ्ट तात्पुरती दुरुस्ती करून वापरले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांसह पदाधिकारी व अभ्यांगत जीव मूठीत धरून या लिफ्टचा वापर करत आहे.
दोन लिफ्टपैकी कधी एक चालू तर एकबंद असते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार होऊनही निधी नसल्याने नवीन लिफ्ट येत नसल्याने जुन्याची दुरुस्ती करून वापरतात आणले जात आहे. आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेतील एक लिफ्ट बंद पडलेले होते. अनेकजण त्यात बसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यात गेल्यानंतर ते बंद असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
लिफ्ट बंद असल्यानंतर प्रशासनाने तेथे ते बंद असल्याचा फलक लावणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन याबाबत गांभिर्याने घेईल, का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषदेमध्ये नवीन लिफ्ट बसवायचे आहे. त्यासाठी सुमारे 44 लाखाचा निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणार आहे. त्यानंतर नादुरुस्त लिफ्टच्या ठिकाणी अद्यावत लिफ्ट बसविले जाणार आहे.