जुन्नर-ऑपरेशन झालेल्या रुग्णास मुरबाड तालुक्यात सोडवण्यासाठी गेलेल्या एका जुन्नरच्या रुग्णवाहिका चालकास विचित्र अनुभव आला आहे. या रुग्णाच्या गावाला जाणारा रस्ताच बंद केल्याचे त्याला आढळले.
कल्याण – नगर महामार्गावरून आत वळल्यानंतर लगेच रस्त्यावरच झाडझुडपे टाकून त्यावर फलक लावण्यात आला होता. त्या फलकावर गाव बंदी सुरू आहे, ती मोडणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते.
जुन्नरचे रुग्णवाहिका चालक कबाडी हे सोमवारी (दि.23) जुन्नरहून एका रुग्णास घेऊन मुरबाड तालुक्यातील डोंगरवाडी येथे गेले होते. येथे गेल्यावर त्यांना अशी विचित्र परिस्थिती दिसली.
विनंती करूनही रुग्णवाहिकेला प्रवेश नाकारल्यामुळे कबाडी हे त्या रुग्णासोबत सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत घरापर्यंत गेले. अशीच परिस्थिती परिसरातील गावांमध्ये असून याबाबत जनजागृती आवश्यक असल्याचे कबाडी यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून मुंबई व पुणे येथून जुन्नर तालुक्यात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. परंतु जुन्नर तालुक्यात कोठेही गावबंदी झालेली नसली तरी गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.