खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका

ढाका  – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि प्रमुख विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची आज सहा महिन्यांसाठी तुरुंगातून सुटका करण्यात आली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर तुरुंगामध्ये करोनाची साथ पसरू नये म्हणून झिया यांची सुटका करण्यात आली आहे.

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख असलेल्या 74 वर्षीय खालिदा झिया या भ्रष्टाचाराच्या दोन खटल्यांमध्ये 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. 2018 च्या 8 फेब्रुवारीपासून त्या तुरुंगात आहेत. मानवतावादी भूमिकेतून खालिदा झिया यांची सशर्त सुटका करण्यात आली असल्याचे गृह मंत्री असदुझ्झ्मान खान कमाल यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान शेख हसिना यांनी या सुटकेला कालच मंजूरी दिली होती.

झिया या 1991 पासून तीनवेळा देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये त्यांच्या पक्षाला 300 पैकी केवळ 6 जागा मिळाल्या. नैतिक अधःपतनाच्या आरोपाखाली त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी करण्यात आली. 2001 ते 2006 दरम्यान पंतप्रधान असताना अनाथाश्रमांसाठी मिळालेल्या विदेशी देणग्यांमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून त्यांना 2018 च्या फेब्रुवारीमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.