- करोनाकाळातील कामगिरीमुळे चर्चेत; वादग्रस्त, गुंतागुंतीचे विभागही सोपविले
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्तएक आणि दोन यांच्याकडे असलेल्या विभागाच्या कामकाजात अदलाबदल केली आहे. करोनाकाळात धडाकेबाज कामगिरीने सर्वत्र चर्चेत असलेल्या अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्यावरील जबाबदारी वाढवित त्यांच्याकडे वादग्रस्त आणि गुंतागुंतीच्या ठरलेल्या विभागाची जबाबदारी सोपवित त्यांच्यावर आयुक्तांनी विश्वास दाखविल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा “ब’ वर्गात समावेश झालेला आहे. त्यामुळे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन आणि महापालिकेचा एक अशी एकूण तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रतिनियुक्तीवर संतोष पाटील (एक) आणि अजित पवार हे अतिरिक्त आयुक्तम्हणून कार्यरत आहेत. तर प्रवीण तुपे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (तीन) चा “अतिरिक्त पदभार’ देण्यात आला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) प्रत्येक प्रस्तावावर शेराकंन करुन चर्चा करीत होते. अनेकदा फाइल प्रलंबित ठेवून दिरंगाई करायचे, त्यावर महापालिकेच्या महासभेत ज्येष्ठ नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्त (एक) यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. गावची पाटीलकी सोडून कामकाजात बदल करा, असा सल्लाही दिला होता. कित्येक फाइल्सवर दहा-पंधरा दिवस सही होत नसल्याने आयुक्तांकडे तक्रारी वाढल्या होत्या.
तर अतिरिक्त आयुक्त (दोन) यांनी कामाचा धडाका लावत करोनाकाळात अत्यंत तत्पर आणि कार्यक्षमतेची चुणूक दाखविली होती. त्यांच्या टेबलवर कधीही फाइल्स पेडींग राहत नाहीत. प्रत्येक विषयात तत्काळ निर्णय घेतल्याने पवार यांच्याकडील विभागाचा कारभार गतिमान झाल्याचे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे.
करोना सारख्या महामारीत अत्यंत जबाबदारीने निर्णय घेतल्याने त्यांच्यावर आता सध्यस्थिती वादग्रस्त ठरलेला पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, तसेच महापालिकेचा महसूल वाढवण्याच्या दृष्टीने बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, तर नद्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी असे महत्त्वाचे विभाग नव्याने त्यांच्याकडे सोपवले आहेत. त्यामुळे महापालिकेतील या विभागांचे कामकाज गतीमान होण्यास मदत होणार आहे.
14 विभागांची जबाबदारी
पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभाग), पर्यावरण अभियांत्रिकी, मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, भूमी आणि जिंदगी, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), निवडणूक जनगणना (आधारसह), सभाशाखा असे महत्त्वाचे 14 विभाग पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.