पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील गतवर्षाच्या किंवा सत्राच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा गेल्या सात महिन्यांपासून रखडल्या होत्या.
त्या कधी होणार याबाबत वांरवार विचारणा होत होती. अखेर दिवाळीनंतर ऑनलाइनद्वारे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने (एमसीक्यु) त्या घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा, बॅगलॉगची परीक्षा व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्यांची परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
करोनामुळे अंतिम वर्ष वगळता इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्षभरातील कामगिरीवरून सरासरी गुण देऊन पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठ कायद्यानुसार बॅकलॉग परीक्षा रद्द करता येत नाहीत. त्या 120 दिवसांत घेणे आवश्यक होते.